पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे सल्लागार, जेष्ठनेते भगवान वाल्हेकर यांची मावळ व पिंपरी चिंचवड जिल्हाप्रमुखपदी निवड करा अशी मागणी जोर धरू लागलीय. रहाटणी-काळेवाडी शिवसेनेचे प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे मागणी केली आहे. सध्या वाल्हेकर हे सल्लागार पदी कार्यरत असून जिल्हाप्रमुख हे पद रिक्त आहे.
दाखले यांनी पक्षप्रमुखांना केलेल्या मागणीच्या पत्रात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना पक्षाच्या जडणघडणीत भगवान वाल्हेकर यांचे खुप मोठे योगदान आहे. असंख्य शिवसैनिक या गोष्टीचे साक्षीदार आहेत. भगवान वाल्हेकर यांनी बाराबलुतेदार समाजातील शिवसैनिकांना खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत ताकद देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य शिवसैनिकांची फौज तयार केली आहे. त्यामाध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी त्यांनी शिवसैनिकांना दिली आहे.
भगवान आप्पा वाल्हेकर हे अतिशय कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आपल्या शिवसेनेचे २ खासदार १ आमदार त्याच बरोबर १४ नगरसेवकांचा फौजफाटा निवडुन आणण्यात यशस्वी झाले होते. त्याच बरोबर भगवान वाल्हेकर शहरप्रमुख असताना संघटन कौशल्याच्या जोरावर प्रत्येक प्रभागात शिवसैनिक पेरण्याचे काम त्यांनी प्रामुख्याने केले आहे. अशा निष्ठावंत शिवसैनिकांची पिंपरी चिंचवड व मावळच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.