पिंपरी (Pclive7.com):- चाकण-शिक्रापूर रस्त्यावर १६ जानेवारी रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातातील जखमी मुलीचा गुरुवार (दि.२३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. धनश्री अंबादास गाढवे (वय ७, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री ही आपल्या आई आणि आईच्या मैत्रिणी सोबत १६ जानेवारी रोजी दुचाकीवरून चालली होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या (एचआर ५५ एव्हह २२८३) या कंटेनरने धनश्रीची आई चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्या तिघीही जखमी झाल्या. धनश्री हिच्यावर पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी उपचारादरम्यान धनश्री हिचा मृत्यू झाला आहे.
भरधाव कंटेनरने पोलिसांच्या गाडीसह अनेक वाहनांना धडक दिली होती. याप्रकरणी कंटेनर चालकावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि अपघात करणे असे दोन गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यातही अपघाताचा गुन्हा दाखल आहे. एका डंपरला धडक दिल्यानंतर कंटेनर बंद पडला. त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे.






















Join Our Whatsapp Group