याच दरम्यान इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच आरोपी भोईटे याच्याबरोबर काही वर्षांपूर्वी रीलस्टार मुलीची ओळख झाली होती. पीडित मुलीला मी मित्राकडे जाऊन येते, असे सांगून संबंधित रीलस्टार रावेत येथे गेली. तेव्हा भोईटे आणि संबंधित रीलस्टारने मद्यप्राशन केले. मध्यरात्रीपर्यंत ही मैत्रीण परत न आल्याने पीडितेने तिला फोन करून हॉस्टेलवर कधी येणार याची अनेक वेळा विचारणा केली. मात्र शेवटी केलेला फोन आरोपी भोईटे यांनी घेतला तसेच रीलस्टार झोपली आहे. थोड्या वेळाने ती येणार आहे. तुला पार्टीसाठी यायचे असल्यास ये, म्हणून सांगितले. याच दरम्यान आरोपी संजय आणि रितिक हे पार्टी करण्याकरिता भोईटे याच्या फ्लॅटवर गेले.
पीडितेला आणायला हे दोघे रावेत येथून संत तुकारामनगर येथे आले. त्यानंतर पीडितेने पाठवलेल्या लोकेशनवर जाऊन संजय आणि रितिक या दोघांनी पीडितेला कारमध्ये बसवून रावेत येथे आणले. रावेत इथे आल्यानंतर आरोपी भोईटे आणि रीलस्टारने आधीच मद्यप्राशन केल्याचे तिच्या लक्षात आले. काही वेळानंतर पीडित, रीलस्टार आणि आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केले. सर्वांनी मद्य प्राशन केल्यानंतर ‘ट्रूथ अँड डेअर’ खेळाला सुरुवात केली.
याच दरम्यान आरोपी भोईटे याने प्रथम रीलस्टारबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित मुलीला फ्लॅटमधील एका स्वच्छतागृहात जाऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला. फोन सुरू असल्याचे पीडितेला आणि आरोपीला लक्षात आले नाही. संबंधित नातेवाईकाने हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडिलांना कळवला. दरम्यान हा प्रकार घडण्यापूर्वी दारूच्या नशेत असलेल्या या मुलीने आई-वडिलांनाही फोन केले होते. मात्र नातेवाईकाने धक्कादायक माहिती सांगितल्यावर पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पिंपरी-चिंचवडमध्ये धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीकडे चौकशी केल्यानंतर हे कुटुंब थेट पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आरोपी संजय आणि रितिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांच्या माहितीवरून आरोपी भोईटे याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक आणि दुर्दैवी बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपी भोईटे याचे पूर्ण नाव, त्याचा फ्लॅट नेमका कुठे आहे, रात्री कुठे गेलो होतो याबाबत काहीच माहिती नव्हते.
पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारावर सर्व आरोपींची नाव निष्पन्न केली. त्यानंतर भोईटे कुठे आहे याचा ठाव ठिकाणा शोधला. त्याचबरोबर संबंधित रीलस्टार मुलीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. या सर्व प्रकारानंतर रात्री उशिरा तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये रावेत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group