पिंपरी (Pclive7.com):- पेट्रोलपंपावर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून घरी जात असलेल्या कर्मचाऱ्यास चालत्या दुचाकीवर बांबूने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.२५) रात्री पावणेबाराच्या सुमारास रहाटणी येथे घडली. प्रवीण बाळासाहेब शेडगे (वय २८, रा. महाराष्ट्र नगरी, नखाते नगर, रहाटणी) असे मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिल्या शिंदे (वय १८), श्रीराम (पूर्ण नाव माहिती नाही. दोघेही रा. रहाटणी), प्रणव (वय १८, पूर्ण नाव माहिती नाही रा. काळेवाडी) आणि अल्पवयीन मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेडगे हे रहाटणीतील नखाते पेट्रोलपंपावर काम करतात. शनिवारी दुपारी अडीच ते रात्री साडेअकराच्या सुमारास ते ड्युटीवर होते. रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी शेडगे यांचा आरोपी पिल्या शिंदे याच्याशी वाद झाला. फिर्यादी हे रात्री कामावरून सुटल्यावर आपल्या दुचाकीवरून घरी जाताना आरोपी पिल्या शिंदे हा आपल्या साथीदारांसोबत आला. रहाटणीतील दत्तनगर कमान ते नखातेनगर कमान या दरम्यान शौर्य एंटरप्रायजेस दुकाना समोर पाठीमागून बांबूने मारून फिर्यादीस गाडीवरून रस्त्यावर पाडले. तसेच, फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group