पिंपरी (Pclive7.com):- शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविला. त्यामुळे संबंधित विद्यार्थिनींचा वसतिगृहामधील प्रवेश एक महिन्यासाठी रद्द करण्यात येईल, अशी नोटीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून बजावण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे हा प्रकार समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील संतनगरमध्ये स्पाईन रोड येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह आहे. एका खोलीत चार विद्यार्थिनी याप्रमाणे २५० विद्यार्थिनी या वसतिगृहात आहेत. यातील एका खोलीतील विद्यार्थिनींनी बाहेरून पिझ्झा मागवून खाल्ला, असे वसतिगृहाच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.
संबंधित चार विद्यार्थिनींना याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. यात ६ फेब्रुवारी २०२५ रोजी बजावण्यात आलेल्या नोटिसीनुसार, ३० जानेवारी रोजी केलेल्या पाहणीत वसतिगृहातील एका खोलीत पिझ्झाचा बाॅक्स निदर्शनास आला. खोलीतील विद्यार्थिनींनी बाहेरून पिझ्झा आणून खाल्लेला आहे. बाहेरील खाद्य पदार्थ वसतिगृहातील आपल्या खोल्यांमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. तसेच संबंधित विद्यार्थिनींना यापूर्वी याबाबत सूचित केलेले असतानाही त्यांनी वसतिगृहात नियमबाह्य वर्तन केले. याबाबत संबंधित चौघींकडे चौकशी केली असता त्यांनी ही बाब नाकारली. चौघींपैकी कोणी बाहेरून पिझ्झा आणला आहे, हे मान्य करत नाहीत. दोन दिवसांत ८ फेब्रुवारीपर्यंत चौघींपैकी कोणी बाहेरून पिझ्झा वसतिगृहात आणलेला आहे हे मान्य करावे अन्यथा चौघींचाही एक महिन्याकरिता वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल, असे वसतिगृहाच्या प्रमुखांनी दिलेल्या नोटिसीत नमूद आहे.





















Join Our Whatsapp Group