मुंबई (Pclive7.com):- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (दि.१३) साळवी यांनी काही कार्यकर्त्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा कार्यक्रम पार पडला. राजन साळवी यांचा हा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना राजन साळवी म्हणाले की, “मी स्वत:ला नशीबवान समजतो, कारण ही जागा पवित्र आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झाली आहे. आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रु आहेत. एका डोळ्यामध्ये दु:ख अश्रु आहेत. गेले ३८ वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेत काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख, २००९, २०१४, २०१९ या कालावधीत मी आमदार होऊ शकलो, त्यानंतर शिवसेना उपनेता झालो. या संपूर्ण वाटचालीत सर्वसाधारण कुटुंबातील सदस्य एवढ्या मोठ्या पदावर पोहचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून आता मला नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यात नक्कीच दु:ख अश्रु आहेत”.

“तर दुसर्या डोळ्यात आनंद अश्रु आहेत, कारण कुटुंबातील सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर प्रेम केलं. २०२२ पर्यंत भाईंनी मला कुटुंबातील एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन केलं. एक दु:ख नक्कीच आहे की अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना त्यांच्याबरोबर जाऊ शकलो नाही. ती त्या वेळची परिस्थिती असेल. पण निश्चितपणे त्यानंतरच्या काळात हा निर्णय घेतला आणि भाईंनी मला सामावून घेतले. हा आनंदाचा क्षण आहे,” असे साळवी यावेळी बोलताना म्हणाले.
“२०२४ साली मला पराभवाला सामोरे जावं लागलं, याला जबाबदार कोण? हा प्रश्न मी आपल्यासमोर मांडला आहे. २०१४ साली भाजपा सेनेची युतीची सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं की माझ्यासारखा निष्ठावंत मंत्री होईल म्हणून. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे माझी शिफारस केली होती, पण दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी त्यावेळी दीपक केसरकर यांना मंत्री केलं. राजन साळवी तिथंच राहिला. तो काळ गेला, २०२४ ची निवडणूक आली, तेव्हाही वाटलं होतं राजन साळवीला संधी मिळेल, मंत्री होईल. उदय सामंत शिवसेनेत आले आणि २०१९ ला मंत्री झाले, ” असे साळवी म्हणाले.






















Join Our Whatsapp Group