पिंपरी (Pclive7.com):- देहूरोड बाजारपेठेतील महात्मा फुले मंडई समोरील व रेल्वे लाईन लगत असलेल्या सायकल दुकानास आज शुक्रवारी (ता ४) दुपारी आग लागली. आगीत दुकानातील आणि पोट माळ्यावरील सायकली जळून खाक झाल्या. आगीची झळ बाजूच्या चप्पल, किराणा आणि प्लॅस्टिक साहित्य विक्री दुकानाला बसून त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले.
मुख्य बाजारपेठेत रहदारीच्या रस्त्यालगत रेल्वेच्या मालकीचे अनेक व्यापारी गाळे आहेत. यात आग लागून नुकसान झालेल्या रवि मंगतराम खन्ना यांच्या सायकल दुकानासह अन्य तीन दुकानांचा समावेश आहे. सकाळी बहुतेक दुकाने उघडली होती. दुकानात आणि बाहेर माल लावण्याचे काम सुरु असताना अचानक सायकलच्या दुकानास आग लागल्याचे निदर्शनास आले. आग तीव्रतेने भडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या आगीची झळ शेजारी चप्पल आणि प्लास्टिकच्या दुकानांनाही बसली. चप्पल दुकानातील लाखो रुपये किंमतीचा मालही जळून खाक झाला. तर किराणा, प्लास्टिक साहित्य विक्री दुकानांनी वेळीच माल बाहेर काढल्याने नुकसान टळले. मात्र, तरीही धान्याचे नुकसान झाल्याचे व्यापारी सुभाष जिंदल यांनी सांगितले. तर त्याच रांगेतील अन्य दुकानांनी आपल्या दुकानाकडे आग पसरण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन वेळीच माल सुरक्षित स्थळी हलवला त्यामुळे मोठे नुकसान टळले, असे साजिद तांबोळी यांनी सांगितले.
दरम्यान, अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच देहूरोड कॅन्टोन्मेंटचा एक बंब दाखल झाला. तर काही वेळाने २९ फिल्ड अॅम्यूनिशन डेपो व केंद्रीय आयुध (सीओडी ) भांडारचा एक बंब दाखल झाला. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.






















Join Our Whatsapp Group