पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील मोरवाडी येथे प्रभाग क्रमांक १० मध्ये आरक्षित भूखंडावर अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून अ प्रभागाच्या अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे पाठपुरावा करीत होत्या. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते या केंद्राचे भुमिपूजन झाल्याने हा विषय मार्गी लागला आहे.
अपंग केंद्राबाबत माहिती देताना अनुराधा गोरखे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागामार्फत नवी मुंबईतील अपंग एज्युकेशन व प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाशेजारी क्रोमा सेंटरजवळ महापालिकेचा आरक्षित सुमारे १८०० चौ. मीटर भुखंडावर हे अपंग केंद्र साकरण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे चार मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी दोन वर्षात सुमारे ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या केंद्रात अंध, अपंग, मतिमंद, गतिमंद अशा विशेष व्यक्तींसाठी सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अपंग, निसमर्थन व्यक्तींना लागणारे दाखले, वैद्यकीय तपासण्या, कार्यशाळा, प्रशिक्षणाच्या उद्देशाने हे केंद्र होणार आहे. तळमजल्यावर चारचाकी, दुचाकी व सायकल पार्किंग, बगीचा, पहिल्या मजल्यावर ६०० लोकांसाठी मल्टीपरपज हॉल, स्वागत कक्ष, कार्यालय, जॉईन टिचिंग स्टाफ रूम, स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व आउटरीच रूमची सुविधा असणार आहे. दुस-या मजल्यावर अधिष्ठता केबिन, बहुअपंग क्लास रूम, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, ब्रेन लिपी, संगीत रूम, व्यवसाय उपचार विभाग, चित्रकला वर्ग, हस्तकला, ई-लर्निंग कक्ष इत्यादी सुविधा असणार आहेत. तिस-या व चौथ्या मजल्यावर सुधार उद्देशक वर्ग, द्रुष्टी बाधित वर्ग, स्वमग्न वर्ग, बालवर्ग, टेलरिंग व ब्युटीशियन कोर्स वर्ग, व्यवसाय प्रशिक्षण श्रवण व वाचा, भौतीकोपचार व मानसोपचार विभाग आणि टेरेस वर पॅनल कव्हर इत्यादींची व्यवस्था असणार आहे, असे अनुराधा गोरखे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group