पिंपरी (Pclive7.com):- “आपला देश शिक्षण , उद्योग, तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहोत, असे आपण अनुभवत असताना फक्त शहर नजरेसमोर आणतो. कारण आपला दृष्टीकोन मर्यादित आहे. प्रत्यक्षात मात्र देशातील प्रत्येक गाव देखील याच वेगाने बदलत आहे. संपर्कयंत्रणा, शेती, शिक्षण, स्वयंरोजगार गावोगाव उपलब्ध होत आहे. या सर्व खेड्यांना, गावांना बरोबर घेऊन आपला देश बदलत आहे,” असे मत प्रदिप लोखंडे यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेत ते ‘देश बदलतोय मित्रांनो’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी सावरकर मंडळाचे विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, विजय सातपुते, जनता बँकेचे संचालक किशोर शहा, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर रवी मनकर, राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, “भारतामध्ये लाखोंच्या संख्येने प्राथमिक शाळा आहेत, त्यापैकी एखाद्या शाळेत काही अनुचित घडले तर मीडिया दिवसरात्र तेचतेच दाखवतो. त्यामुळे आपण निराश होतो. पण तसे आजिबात नसून अगदी खेडेगावात सुद्धा सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून उत्तम पद्धतीने शाळा सुरु आहेत. तेथील शिक्षक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरी शाळांप्रमाणेच विद्यार्थी घडवीत आहेत, आपण फक्त यथाशक्ती योगदान देण्याची गरज आहे. किमान त्यांचे कौतुक करण्याची गरज आहे.
अलिकडच्या काळात सरकारने ग्रामीण भारतासाठी रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती, तंत्रज्ञान, स्वयंरोजगार संधी आदींसाठी मोठ्या प्रमाणात वेगाने कामे सुरु केली असून काही कामे पूर्ण ही झाली आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक वस्तू, सुविधा, मनोरंजन, ज्ञानविज्ञान गावापर्यंत पोहोचले असून गावातील प्रत्येक उत्पादन विनाविलंब शहरात मिळत आहे. या बदलामुळे गावातील तरुण आता नोकरीच्या मागे न लागता परत सुधारित शेती, व्यापार, वाहतूक, कृषीपर्यटनाकडे वळत आहे. आपण फक्त त्यांच्या व सर्वच ठिकाणी लहान मोठे व्यवसाय करणा-यांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यायची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार भास्कर रिकामे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group