पिंपरी (Pclive7.com):- ‘मे ब्लू स्काय मीडिया’ आणि ‘धिरेंद्र ग्रुप’ या जाहिरात कंपनीने शहरातील अनेक ठिकाणी जाहिरातीचे फलक लावले आहेत. तसेच फलक उभे करताना झाडांचा अडथळा येत असल्याने मे ब्लु मीडिया या कंपनीने भक्ती -शक्ती येथील ३ वृक्षांची तोड केली आहे. तसेच पिंपरीतील मोरवाडी चौकातील आहिल्यादेवी पुतळ्याच्या पाठीमागे धिरेंद्र ग्रुप या कंपनीने जाहिरात फलक लावण्यासाठी ४ मोठ्या वृक्षांची तोड केली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन वरील दोन्ही कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे सतीश कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे महापालिकेकडून झाडे वाचवा, झाडे जगवा अशी जागृती करण्यात येत आहे. तसेच अनेक सामाजिक संघटनाकडून ‘खिळे मुक्त झाड आणि आळे मुक्त झाड’ असे उपक्रम राबवून झाडे वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महापालिकेकडून अशा जाहिरात कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
शहरात अनेक ठिकाणी नवीन जाहिरातीचे फलक बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून लावण्यात आलेले आहेत. तरीदेखील महापालिकेकडून अशा कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
शहरात अशा कंपनीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरी चौकशी करुन संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सतीश कदम यांनी निवेदनात केली आहे.
दरम्यान, मे ब्लू स्काय मेडीयाशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. जाहिरात होर्डींग उभारताना आमच्या संस्थेकडून कोणत्याही झाडांची कत्तल केली गेलेली नाही. पर्यावरणाला कुठेही धक्का लागेल असे काम आमची संस्था करत नाही. सर्व प्रकारची परवानगी तसेच नियमातच आमचे होर्डींग उभे राहतात असे त्यांनी स्पष्ट केले.





















Join Our Whatsapp Group