
काँग्रेसने आमच्यावर वारंवार अन्याय केला – थोपटे
राजकारणात संघर्ष करायला करावाच लागतो, त्यातून आम्ही कधीच डगमगलो नाही. माझ्या वडिलांना देखील कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. मी देखील संघर्ष केला. त्यातून सहकार संस्था असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सर्वच ठिकाणी एक हाती सत्ता मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने आमच्यावर वारंवार अन्याय केला. आमच्यावर पक्ष सोडण्याची ही वेळ आणली असल्याचे संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे.
भाजप प्रवेशामागचे नेमके कारण काय?
संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा हा कारखाना अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केले होते. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती. आता या कारखान्याला मदत मिळण्यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये गेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संग्राम थोपटे यांचा राजकीय प्रवास
संग्राम थोपटे यांना राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. संग्राम थोपटे हे 2002 ते 2003 या काळात भोर पंचायत समितीचे उपसभापती होते. 2007 ते 2024 या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहिलेले आहेत. याशिवाय ते याच काळात भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लढवली होती. या निवडणुकीत ते जिंकून आले होते. यानंतर 2014 आणि 2019 अशी सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकले होते.
कोण आहेत संग्राम थोपटे?
- सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे यांचे संग्राम थोपटे पुत्र आहेत. संग्राम थोपटे यांना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला आहे.
- 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले होते.
- 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवत ते भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत विजयी होत हॅट्रिक केली.
- 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात संग्राम थोपटे यांना पराभव स्वीकारावा लागला.
- संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रुजवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले. सध्याच्या अनेक बड्या नेत्यांना अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच तिकीट देऊन संधी दिली होती. त्यामुळे आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
- 40 वर्षांपासून भोर विधानसभेवर थोपटे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. सहा वेळा अनंतराव थोपटे आमदार झाले आहेत. 3 वेळा संग्राम थोपटे आमदार म्हणून निवडून आले आहेत. अनंतराव थोपटे सलग 14 वर्ष मंत्री राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रमधील काँग्रेसचे मोठे नाव म्हणून थोपटे यांची ओळख आहे.























Join Our Whatsapp Group