आरपीआयच्या पिंपरी चिंचवड मध्यवर्ती कार्यालयाचे वाकड येथे आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- काश्मीर मध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर केलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने भारताची छेड काढण्याचा प्रकार आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. भारतातील मुस्लिम नेत्यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा निर्धार मोदी यांनी केला आहे. पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. पाकिस्तान सोबत शांतता प्रस्थापित करण्याची भारत सरकारची इच्छा होती, परंतु आतंकवादी हे होऊ देत नाहीत. पाकिस्तान आतंकवाद्यांना सहारा देते हे वारंवार सिद्ध झाले आहे. आता आरपारच्या लढाई शिवाय पर्याय नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.

आठवले यांच्या हस्ते रविवारी (दि.२७ एप्रिल) वाकड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि जैतवन बुद्ध विहार येथे गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यानंतर वाकड येथे झालेल्या स्वागत समारंभात उपस्थितांशी आठवले यांनी संवाद साधला.
यावेळी आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, आरपीआय महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, नंदू शेठ बारणे, राम वाकडकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, संघटक सचिव सूर्यकांत वाघमारे, आरपीआय युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड तसेच अजिज शेख, खाजाभई शेख, सम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी, माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात आरपीआयला किमान एक मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा सुरू आहे. तसेच महामंडळे व जिल्हा नियोजन समिती आणि इतर समित्यांवर देखील प्रत्येक जिल्ह्यातील किमान २०० आरपीआयच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढू नये. यासाठी ग्रामीण भागातच बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी काम केले पाहिजे. विनोबा भावे यांना भूदान चळवळीत मिळालेल्या जमिनी भूमिहीन शेतकऱ्यांना व दलित, ओबीसींना देण्यात आल्या, त्याप्रमाणे पुन्हा महाराष्ट्र शासनाने गावोगावी सर्वेक्षण करून भूमिहीनांना पाच एकर जमीन देण्यासाठी काम करावे. मुंबई, पुणे सह जेथे एसआरएचे प्रकल्प सुरू आहेत. तेथील २०११ पर्यंतच्या झोपड्या कायम करून तेथे लाभधारकांना किमान ४५० स्क्वेअर फुटाची सदनिका दिली पाहिजे अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले असल्याचे आठवले यांनी सांगितले.

आरपीआय केवळ बौद्ध धर्मीयांचा पक्ष नसून या पक्षात सर्व जाती ओबीसी, मराठा, हिंदू, मुस्लिम, शिख, इसाइ, जैन यांचा समावेश आहे. आरपीआयचा चेहरा आणखी व्यापक करण्यासाठी एक जून रोजी ठाणे येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये पक्ष वाढीच्या दृष्टीने ठराव पास करण्यात येणार आहेत. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर, जानेवारी मध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने काम करावे. कुणाल वाव्हळकर यांचा जनसंपर्क चांगला असून वाकड मधून त्याला संधी द्यावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महायुतीसोबत किमान आठ ते दहा जागा आरपीआयला मिळाव्यात अशीही मागणी आठवले यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्था सह राज्य सरकार देखील सफाई कर्मचाऱ्यांच्या जागा ठेकेदारी पद्धतीने भरत आहेत. याला आरपीआयचा विरोध आहे, जे कायमस्वरूपी काम आहे तेथे कायम कामगार नेमून त्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.