पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दोन दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात संततधार सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरण सध्या ७६.२२ टक्के भरले आहे. त्यामुळे आज (दि.०६) रात्री ११ वाजता २८०० क्युसेक्सने विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने म्हटले आहे की, पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७६.२२ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. आज (दि.०६) रात्री ९ वाजताच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने १८०० क्युसेक्स मुक्त विसर्ग करण्यात येत आहे.

तरी, आज (दि.०६) रात्री ११ वाजता पाणलोट क्षेत्रातील येव्यानुसार सांडव्यावरील विसर्गामध्ये वाढ होऊन एकुण विसर्ग २८०० क्युसेक्स इतका होण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group