मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, जनहितार्थ लक्षवेधी सूचनांवर झालेल्या चर्चांनी सभागृहात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. आमदार अमित गोरखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या मौजे खेड-मानेवाडी ते शिंपोरा रस्त्यावरील नांदणी नदीवरील पुलाच्या कोसळण्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला.

अमित गोरखे यांनी सभागृहाला सांगितले की, हा पूल २५ मे, २०२५ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे वाहून गेला. विशेष बाब म्हणजे, हा पूल सन २०१२-२०१३ मध्ये, म्हणजेच अवघ्या १२ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. इतक्या कमी कालावधीत पूल कोसळल्याने त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांनी या ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली, तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची विनंती केली.

यावर ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले की, या प्रकरणाचा चौकशी अहवाल शासनाला सादर झाला आहे. मात्र, या चौकशी अहवालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असल्याने, या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल. तसेच, जोपर्यंत ही पुनर्चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच, संबंधित आणि चौकशी दरम्यान समोर येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात दिली.

आमदार गोरखे यांच्या या लक्षवेधी सूचनेमुळे सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांच्या गुणवत्तेचा आणि जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला. मंत्री महोदयांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्याने, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
























Join Our Whatsapp Group