पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील पाचव्या मजल्यावर प्रशासनाने थेट पद्धतीने आणि कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केला आहे. या बांधकामामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, गंभीर रुग्णांची अन्यत्र हलवणूक करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागेची हद्द कमी, वाहतुकीस अडथळा..
पाचव्या मजल्यावरील ४०+४०+४० रुग्ण क्षमतेच्या तीन स्वतंत्र विभागांत रुग्णांसाठी पूर्वी व्यवस्थित जागा उपलब्ध होती. मात्र, अचानकपणे खाजगी ठेकेदारामार्फत सुरू करण्यात आलेल्या बांधकामामुळे जागेची हद्द कमी झाली आहे. यापूर्वी दोन ट्रॉली एकावेळी जाऊ शकत होत्या, मात्र आता एकच ट्रॉली नेण्यास जागा अपुरी पडत आहे. रुग्ण व कर्मचाऱ्यांची ये-जा अडचणीत आली असून, गंभीर रुग्णांच्या उपचारांवर त्याचा परिणाम होत आहे.

रुग्णांना दुसरीकडे हलवले, आवाजाचा त्रास..
बांधकामाच्या कारणास्तव रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आले असून, आजूबाजूच्या रुग्णांना तोडफोडीच्या आवाजामुळे त्रास सहन करावा लागत आहे. हे संपूर्ण काम रुग्णालय प्रशासनाच्या संमतीशिवाय होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. संबंधित आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

निविदा प्रक्रिया न करता थेट बांधकाम – संशयास्पद व्यवहार?
सदर बांधकामासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविलेली नाही किंवा टेंडर जाहीर केलेले नाही. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. “या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल जाहीर करावा व जबाबदारांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

पावसाळ्यात नातेवाईकांची अवस्था बिकट..
“पावसाळ्याच्या दिवसात रुग्णालयात जागेअभावी नातेवाईक फरशांवर झोपून थांबत आहेत. निवारा केंद्र नाकारून थेट रुग्णांच्या जवळ थांबण्याला ते प्राधान्य देतात. अशा स्थितीत प्रशासनाने बांधकामासाठी पाचव्या मजल्याचाच विचार का केला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.






















Join Our Whatsapp Group