पिंपरी (Pclive7.com):- संतांची भूमी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या भोसरी परिसराला आता गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात ग्रासेल आहे. ‘भयमुक्त’ भोसरीची घोषणा देऊन सत्तेत आलेली मंडळीच गुंडांचे पाठीराखे झालेत. गल्लो-गल्ली ‘दादा’गिरी वाढलीय, वाहनांच्या तोडफोडी घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. तसेच कामगारांना लुटणे, टपरीधारकांकडून हप्तेगिरीचा धंदा गावगुंडांकडून राजरोसपणे सुरू आहे. सध्या संपूर्ण भोसरी परिसरातील रहिवासी दहशतीत असून ‘कुठे गेलेत अच्छे दिन’ असा सवाल करित असल्याचे मत राष्ट्रवादीचे माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केले आहे.
विलास लांडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, संतांची भूमी म्हणून ओळखणाऱ्या भोसरीची ओळख आता ‘गुंडांचा अड्डा’ म्हणून होत आहे. गेल्या ४ वर्षात खून, चोरी, हाणामारी सारख्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. तर वाहनांची तोडफोड करून छोट्या-मोठ्या टोळ्या उदयास येत आहेत. गेल्या १० दिवसात भोसरीतील आदिनाथनगर भागात वाहनांच्या तोडफोडीच्या दोनदा घटना घडल्यात. स्थानिक आमदार, खासदार तसेच महापालिकेतील सत्ता उपभोगत असणाऱ्यांना याचे कसलेच गांभिर्य नाही. वारंवार होत असलेल्या तोडफोडीच्या घटनांमुळे येथील नागरिक कमालीच्या दहशतीत आहेत. ही बाब शहराच्या हितासाठी योग्य नसून भोसरीतील कायदा सुव्यवस्था कडक करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group