पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून पूर्ण दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पवना धरणातील जलसाठा पूर्ण क्षमतेने भरलेला असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही शहरात लागू असलेली १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. २०१८-१९ पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा व्यवस्था सुरू असून ती तात्पुरती असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र सात ते आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पवना धरणातील जलसाठा १५ ते २० टक्क्यांवर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र सध्या मुसळधार पावसामुळे धरण १०० टक्के भरले असूनही कपात कायम असल्याने अनेक सोसायट्या, निवासी संकुले आणि बैठ्या घरांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम होत असून मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे.

मनसेने महापालिका प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करणे, शहराला पूर्ण क्षमतेने व पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू करणे आणि सिंचन विभाग व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून जलसाठ्याच्या परिस्थितीनुसार तातडीने निर्णय घेण्याची कार्यपद्धती विकसित करणे या मागण्यांचा समावेश आहे.
दरवर्षी धरण पूर्ण भरल्यानंतर लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यानंतरच पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय का घेतला जातो, असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे. दरम्यान, ४८ तासांच्या आत पाणी कपात मागे घेऊन नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.




















Join Our Whatsapp Group