पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यातील एका मुलीच्या २६ वर्षीय प्रियकराला ११ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना २२ जुलै रोजी सांगवीतील पिंपळे गुरव परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मयत तरुणाचे नाव रामेश्वर घेंगट असून, त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.

मात्र दोघेही लग्नावर ठाम असल्याने, तरुणीच्या कुटुंबियांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. रामेश्वर त्याच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या घरी गेला. तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे त्याच्या गुप्तांगावर, डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.

ही माहिती सांगवी पोलिसांना मिळाल्यानंतर, त्यांनी रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगटला मारहाण करून खून केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group