चाकण (Pclive7.com):- चाकण येथे वाहतूक नियमन करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्कॉर्पिओ चालकाने धडक देऊन पळ काढला. वाहनावर पेंडिंग असलेला दंड भरण्यास सांगितल्याने चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना शनिवारी (३० ऑगस्ट) दुपारी आळंदी ते चाकण रोडवरील सिग्नलजवळ घडली.

देवयानी सोनवणे असे जखमी पोलीस महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्कॉर्पिओ गाडी (एमएच १४/डीए ५२५२) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या सहकाऱ्यासोबत मेदनकरवाडी गावच्या हद्दीत वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी सिग्नलवर थांबलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीला त्यांनी तपासले असता, त्या गाडीवर ६२ हजार रुपयांचा दंड थकीत असल्याचे दिसून आले. फिर्यादीने चालकाला लायसेन्स विचारल्यावर त्याने अरेरावीची भाषा करत ‘माझ्याकडे लायसेन्स नाही, काय करायचे ते करा’ असे म्हटले.

फिर्यादीने गाडी बाजूला घ्यायला सांगितल्यावर दंडापासून वाचण्यासाठी त्याने शिवीगाळ केली आणि उलट गाडी पुढे घेतली. गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला खरचटले आणि उजव्या हाताला धक्का बसला. आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करून पळ काढला. चाकण पोलीस तपास करत आहेत.























Join Our Whatsapp Group