मुंबई (Pclive7.com):- मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारपासून (दि.०१) पाणी पिणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांचा राज्यभरातून ओघ असून आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगे यांनी इरादा जाहीर केल्याने महायुती सरकारची कोंडी झाली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. मुंबईत आलेल्या आंदोलकांची संख्या वाढू लागली आहे.

‘आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नाही. काय करायचे ते करा, आरक्षण घेणारच. माझे उपोषण सोमवारपासून कडक राहणार आहे. सोमवारपासून मी पाणी पिणे बंद करणार आहे. हे माझे आमरण उपोषण आहे,’ असे जरांगे यांनी जाहीर केले. कुणी दगडफेक करु नका. समाजाची मान खाली जाईल असे करु नका. मुंबईतले रस्ते अडवू नका. अन्नछत्राच्या नावावर पैसे गोळा करु नका. मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे आवाहन जरांगे यांनी गावोगावच्या मराठा कार्यकर्त्यांना केले आहे.























Join Our Whatsapp Group