पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये रात्री १२ च्या सुमारास दुचाकीवर येऊन जबरदस्ती गणपतीची वर्गणी मागितल्या प्रकरणी तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराजे मित्र मंडळाचे तीन सदस्य (दि.२९) रोजी रात्री १२ च्या सुमारास पिंपळे सौदागर मधील गणेशम सोसायटी फेज २ च्या गेटवर आले होते. त्यांनी गेटवर असलेल्या सुरक्षारक्षका सोबत हुज्जत घालत आम्हाला आतमध्ये प्रवेश करू देत, गेट बंद करू नको असा दम दिला. जबरदस्ती सोसायटीच्या चेअरमनला आम्हाला आताच्या आता गणपती मंडळाला ३,५०० रुपये वर्गणी देण्याची मागणी केली. मंडळाच्या पावतीवर कार्यकर्त्यांनी मोबाईल क्रमांक टाकून फोन पे करण्यासही सांगितले. जर पैसे दिले नाही तर आम्ही उद्या पुन्हा याच वेळला परत येऊ.. असे म्हणत धमकावले व जाताना चेअरमन यांच्या कडून १,००० रुपये घेऊन गेले.

याप्रकरणी शिवराजे मंडळाचे तीन सदस्य सचिन गोरख ओव्हाळ (वय ४५ वर्षे रा. सुरेश प्रोव्हिजन्स स्टोअरच्या बाजुला, दापोडी), अजय चंद्रकांत ठोंबरे, (वय ४० वर्षे रा. गणपत जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी), शुभम त्र्यंबक गायकवाड (वय २८ वर्षे रा. मानकर अपार्टमेट, महादेव मंदिर, जवळ, जुनी सांगवी या तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम 308, 308 (3) आणि 3 (5) नुसार गुन्हा दाखल करत सांगवी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. ढगे हे पुढील तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group