पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ ने एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत दोन वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण १४ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आबासाहेब अंकुश मदने (३५, विकासनगर, देहुरोड), कैलास पांडुरंग टॉन्पे (३२, गायकवाड नगर, दिघी), वैभव जनार्दन सुर्यतळ (३०, लक्ष्मीनगर, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी तीन अज्ञात इसमांनी मुंबईला जाणाऱ्या दोन वृद्ध महिलांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या लाल रंगाच्या होंडा सिटी कारमध्ये बसवले. वाकड ब्रिजपासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत त्यांना फिरवून, आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यात चेन, बांगड्या आणि अंगठी यांचा समावेश होता, बळजबरीने काढून घेतले. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत ८ लाख ४७ हजार रुपये होती. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेल्या होंडा सिटी कारची माहिती मिळवून, १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातून तीन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ५ लाख ७० हजार रुपयांची होंडा कार जप्त केली आहे. एकूण १४ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी आबासाहेब मदने याच्याविरुद्ध यापूर्वीही बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, प्रविण दळे, नितीन ढोरजे, पोलीस कर्मचारी कुणाल शिंदे, सुरेश जायभाये, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवि पवार, धनंजय जाधव यांनी केली.






















Join Our Whatsapp Group