महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी अजित पवार मैदानात..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दंड थोपटले आहेत. महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने ‘जनसंवाद’च्या माध्यमातून अजितदादा पवार पिंपरी चिंचवडच्या मैदानात उतरले आहेत.

अजितदादा पवार यांनी आज (दि. २०) काळेवाडी येथील रागा पॅलेस येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत जनसंवाद कार्यक्रम घेत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस, राज्य शासन, महामेट्रो, एमआयडीसी व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या जनसंवादात शहरातील हजारो नागरिकांनी अडचणी, समस्या व तक्रारी मांडल्या. त्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण व तरूणींनी रांगा लावल्या होत्या. तक्रारींची दखल घेत अजित पवारांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. उपमुख्यमंत्र्यांनी म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तात्काळ अधिकार्यांना आदेश दिल्याने अर्जदार नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, अनेकांना उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधता न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे थेट तक्रार ऐकणार असल्याने शहरभरातील नागरिकांनी कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी केली होती. नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना तक्रारींचा अर्ज दिला जात होता. त्यानंतर दीड ते दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांपर्यंत पोहचता येत होते. ते तक्रार ऐकून घेऊन अर्जावर योग्य तो शेरा मारत, संबंधित अधिकार्यांना कार्यवाही करण्यास सांगत होते. त्यावर संबंधित अधिकार्यांकडून पुढील कार्यवाहीसाठी तातडीने पावले उचलली जात होती. उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचे समाधान नागरिकांच्या चेहर्यावर उमटत होते. सर्वांधिक तक्रारी या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संदर्भात होत्या. त्यावर आयुक्त शेखर सिंह यांच्यासह इतर अधिकार्यांकडून माहिती देण्यात येत होती.

जनसंवादाची दुपारी दोनपर्यंत अजितदादांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. वेळ संपल्यानंतरी रांगेत मोठ्या संख्येने नागरिक व महिला उभ्या होत्या. अजितदादा पवार हे व्यासपीठावरून उठल्यानंतर नागरिकांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली. उर्वरित नागरिकांचे अर्ज गोळा करुन घेण्यात आले. त्या सर्व अर्जावर कार्यवाही होईल, असे आश्वासन देऊन अजितदादांनी जनसंवाद संपवला.






















Join Our Whatsapp Group