पिंपरी (Pclive7.com):- “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजात सुसंस्कारित, कर्तव्यदक्ष व राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडवले जात आहे. मलादेखील संघाच्या शाखेतून उत्तम मूल्य आणि जीवनदृष्टी लाभली,” असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध वैद्यकीय चिकित्सक डॉ. निलेश भंडारी यांनी व्यक्त केले.

कासारवाडी येथील विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर सांगवी गटाचे माननीय संघचालक लक्ष्मण पवार, नगर कार्यवाह राजेंद्र राजहंस, तसेच पिंपरी-चिंचवड जिल्हा प्रचारप्रमुख सारंग पापळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भंडारी म्हणाले, “संघ शाखेत बौद्धिक व शारीरिक विकासासोबतच मूल्याधिष्ठित जीवनशैलीची शिकवण मिळते. हे संस्कार समाजात परिवर्तन घडवणारे ठरतात. संघाच्या सेवाकार्यामुळे देशभरात निस्वार्थ भावनेने कार्य करणारा मोठा कार्यकर्तावर्ग तयार झाला आहे.”
प्रमुख वक्ते सारंग पापळकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आढावा घेत, “संघाच्या शाखांमधून निर्माण होणारी व्यक्तिमत्त्वे समाजाच्या विविध क्षेत्रांत राष्ट्रहितासाठी कार्यरत आहेत. नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, तसंच सामाजिक संकटांच्या वेळी संघ स्वयंसेवक अग्रस्थानी राहतात,” असे सांगितले.

संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे कार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अधोरेखित करताना पापळकर म्हणाले, “शताब्दी वर्षानिमित्त संघाने ‘कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वबोध, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये’ या पंचसूत्रीच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू केली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने संघकार्य समजून घेऊन त्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रपूजन, शारीरिक प्रात्यक्षिके, घोषवादन, सांघिक गीत, अमृतवचन, व भारत मातेची प्रार्थना सादर करण्यात आली. उत्सवापूर्वी स्वयंसेवकांचे भव्य पथसंचलन कासारवाडी परिसरातून निघाले. या संचलनाचे नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले.
या उत्सवाला परिसरातील नागरिक, महिला, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजात सुसंस्कारित, कर्तव्यदक्ष व राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडवले जात आहे. मलादेखील संघाच्या शाखेतून उत्तम मूल्य आणि जीवनदृष्टी लाभली. संघ शाखेत बौद्धिक व शारीरिक विकासासोबतच मूल्याधिष्ठित जीवनशैलीची शिकवण मिळते. हे संस्कार समाजात परिवर्तन घडवणारे ठरतात. संघाच्या सेवाकार्यामुळे देशभरात निस्वार्थ भावनेने कार्य करणारा मोठा कार्यकर्तावर्ग तयार झाला आहे.”– डॉ. निलेश भंडारी,वैद्यकीय चिकित्सक, कासारवाडी.






















Join Our Whatsapp Group