पिंपरी (Pclive7.com):- घटस्फोटाची प्रक्रिया खूपच त्रासदायक आणि वेळखाऊ असते. उमेदीचा काळ न्यायालयाच्या चकरा मारण्यात निघून जातो. आधीच दुखावलेली मने आरोप-प्रत्योरापांच्या फैऱ्यात पुरती जखमी होतात. हे सर्व टाळत एकाच दिवसात घटस्फोट झाल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरातील एका जोडप्यासोबत झाली.

एकमेकांवर कोणतेही आरोप न करता, आपसातील देणे-घेणे आपसातच मिटवून परस्पर सहमतीने हा घटस्फोट झाला. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही पक्षांकडून एकाच वकिलाने काम पाहिले. पती- पत्नीचे वय आणि त्यांच्या भविष्याचा विचार करत न्यायाधीशांनी एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करत दोघांना आनंदाने पुढील आयुष्य जगण्यासाठी स्वतंत्र केले. संयुक्त दिवाणी न्यायाधीश, सिनियर डिव्हीजन, ए.यू सुपेकर यांनी हा आदेश दिला.

ॲड. रामकिशन नानक सैगल यांनी सांगितले की, शहरातील एक उच्चशिक्षित जोडप्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांना अंदाज आला की आपली जीवनशैली, विचारसरणी एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ते एकमेकांपासून वेगळे राहू लागले. प्रत्येक बाबतीत खटके उडून संपूर्ण आयुष्य नको त्या तडजोडीत घालविण्याऐवजी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. एव्हाना त्यांनी वयाची तिशी ओलांडली होती. घटस्फोट घेण्यात येणाऱ्या अडचणींविषयी दोघांशी चर्चा केली. त्या दोघांनीही समजूतदारपणा दाखवत एकमेकांची देणी-घेणी न्यायालयाच्या बाहेरच करुन घेतली. एकमेकाविरुद्ध कोणत्याही केस किंवा दावे दाखल न करता परस्पर सहमतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली. न्यायाधीशांनी दोघांची वये आणि त्यांच्या भविष्याचा विचार करत त्यांना वेगळे होण्याची परवानगी देत घटस्फोटाची याचिका मंजूर केली.
आम्ही सर्वप्रथम समजुतीने वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही बाबतीत सोबत राहणे जास्त त्रासदायक ठरते. अशावेळी एकमेकांविरोधात आरोप करुन न्यायालयीन लढाई लढण्यात आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया जातो. आर्थिक आणि मानसिक क्षती देखील होते. जेव्हा सोबत राहणे शक्यच नसते तेव्हा परस्पर सहमतीने आणि समजुतीने वेगळे होणे चांगले ठरते. न्यायालयाने एका दिवसात घटस्फोट याचिका मंजूर करत दोघांच्या आयुष्यातील अमूल्य वेळ वाचविला आहे.– ॲड. रामकिशन नानक सैगल






















Join Our Whatsapp Group