पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने “पिंपरी चिंचवड वैभव” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि.३ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता, निगडी प्राधिकरण येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शांता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुल, (सावली हॉटेल जवळ) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती या काव्य संग्रहाची संकल्पना मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक संभाजी बारणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संस्थेचे अध्यक्ष व संपादक राजन लाखे आदी उपस्थित राहणार आहेत.

या काव्यसंग्रहात पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख स्थळांविषयी जसे की, महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर, पवित्र इंद्रायणी आणि पवना नदी, भक्ती शक्ती शिल्प, इस्कॉन मंदिर, वैष्णव माता मंदिर, पिंपरी चिंचवड मनपा, पिंपरी चिंचवड प्राधिकरण, उद्योग नगरी, हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनी, टाटा मोटर्स, दुर्गा देवी टेकडी, उद्योग नगरी, साहित्य नगरी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, गुलाब पुष्प उद्यान, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, बर्ड व्हॅली, पिंपरी, चिंचवड, भोसरी गाव, महाराष्ट्र साहित्य परिषद, नाट्य परिषद अशा विविध प्रेक्षणीय व महत्वपूर्ण स्थळांचा गौरव करणाऱ्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास मुक्त प्रवेश असून काव्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी बारणे यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group