पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीच्या विरोधात तिसरी आघाडी तयार करण्यात आली आहे. या सर्व पक्षाच्या विरोधात एक सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तिसऱ्या आघाडीची पुण्यात भांडारकर रोडवरील हॉटेल रविराज येथे दि.२६ जुलै रोजी बैठक आयोजित केली असल्याची माहिती मुख्य संयोजक हेमंत पाटील यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश बी.जे.कोळसे पाटील व शेतकरी संघटनेचे नेतेे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेमंत पाटील म्हणाले की, तिसऱ्या आघाडीच्या या बैठकीला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, मराठा महासंघाचे जेष्ठ नेते पुरूषोत्तम खेडेकर यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. त्याच बरोबर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अँड. सुरेश माने, इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे गजानन शिरसाट, वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे संजय कोकरे, हिंदुस्तान जनता पार्टीचे इंजिनिअर बी.यु.गोसावी, अवामी विकास पार्टीचे समशेर पठाण, वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे सलिम शेख, अखिल भारतीय सम्राट सेनेचे अध्यक्ष भीमराव कडाळे-पाटील, भारतीय सुराज्य पक्षाचे सचिव विष्णू चव्हाण आदि प्रमुख पक्षाचे नेते, प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, राज्यात लोकसभा व विधानसभा मतदार संघात ज्या जातींचे वर्चस्व आहे अशा उमेदवारांना संधी देणार, सर्व जाती धर्मांना व नेत्यांना एक प्रकारे स्वत:चे व्यासपीठ तयार करून देण्याचा या तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न असल्याचे हेमंत पाटील यांनी शेवटी बोलताना स्पष्ट केले.






















Join Our Whatsapp Group