पिंपरी (Pclive7.com):- पीएमपीएमएलच्या भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊवर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाल्याची वेदनादायक घटना घडली आहे. तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

सुधा बिहारीलाल वर्मा असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे तर राधा राममनोज वर्मा असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमुळे ही घटना झाली असून चालक किरण भटू पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राधा आणि तिचा पती तळवडे येथील खासगी कंपनीत कामाला आहेत. ती गरोदर असल्याने मदतीसाठी दोन महिन्यांपूर्वी लहान बहीण सुधा हिला गावाकडून बोलावून घेतले. त्यांचा भाऊही सोबत राहण्यास असून तोही खासगी कंपनीत कामाला आहे. रात्रपाळी करून आल्यानंतर राधाचा पती मंगळवारी घरी झोपला होता. तर राधा कामावर गेली होती.

दुपारी एकच्या सुमारास ती घरी आली. जेवण करून सुधाला सोबत घेऊन पायी चालत कंपनीत परत कामावर जात होती. रस्ता ओलांडत असताना भरधाव बसने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने सुधाचा मृत्यू झाला, तर राधा गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.





















Join Our Whatsapp Group