
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २७, रहाटणी–श्रीनगर येथील पवनानगर परिसरात सार्वजनिक जागांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या उपक्रमात सफाई कर्मचाऱ्यांनी केवळ स्वच्छता न करता टाकाऊ टायर, पाइप्स यांसारख्या वस्तूंचा कल्पकतेने उपयोग करून रस्त्याकडील जागा व सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य वाढवले आहे. या सुशोभिकरण उपक्रमाचे उद्घाटन स्थानिक नागरिक व दुकानदारांच्या हस्ते करण्यात आले.

हा अभिनव उपक्रम ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यामध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक पृथ्वीराज कांबळे व शशिकांत मोरे, आरोग्य निरीक्षक गणेश राजगे तसेच सर्व आरोग्य मुकादम यांनी विशेष मार्गदर्शन केले. या कामात डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट एण्ड सर्व्हिसेस संस्था आणि शुभम उद्योग संस्थेने विशेष परिश्रम घेतले आहेत.

शहरातील अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकल्याने कचऱ्याचे ढीग साचतात. त्या ठिकाणी मोकाट कुत्री व जनावरे भटकत असल्याने अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. अशा ठिकाणी आरोग्य विभागाकडून सुशोभिकरण करून कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात येत असून, नागरिकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

आरोग्य विभागाची ही कलात्मक मोहीम संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. टाकाऊ वस्तूंच्या कल्पक वापरातून पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छता व सौंदर्याचा नवा आदर्श निर्माण करत असल्याचे मत सहाय्यक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन आरोग्य निरीक्षक गणेश बबन राजगे यांनी केले आहे. सुंदरतेच्या माध्यमातून जनजागृती करत आरोग्य विभाग नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करत आहे.






















Join Our Whatsapp Group