पिंपरी (Pclive7.com):- माजी महापौर व भाजप नेते संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी आज प्रभाग क्रमांक २१ मध्ये भव्य प्रचार फेरी काढत निवडणूक प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला. पिंपरी गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे विधिवत पूजा व नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.

या भव्य प्रचार रॅलीत माजी नगरसेविका उषा वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, अमर मुलचंदाणी, माजी नगरसेवक अरुण टाक, विशाल वाघेरे, सचिन सौदाई, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या मोनिका निकाळजे व सुरेश निकाळजे, तसेच कुणाल साठे, अनिता वाळुंजकर, बबलू सोनकर, गणेश ढाकणे आदी भाजप पॅनलमधील सर्व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय महिला कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थितीही लक्षणीय होती.

पिंपरी गावातून सुरू झालेल्या या प्रचार फेरीत तब्बल पाच ते साडेपाच हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “भाजप जिंदाबाद”, “विकासाच्या नावावर मत द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ही रॅली पिंपरी गाव, अशोक थिएटर, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंद नगर मार्गे झुलेलाल मंदिर येथील घाटावर शांततेत समाप्त झाली.
यावेळी माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपने केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली.

प्रचारादरम्यान उपस्थित नागरिकांना संबोधित करताना संजोग वाघेरे म्हणाले, “पिंपरी गाव व प्रभाग क्रमांक २१ चा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी सुविधा या मूलभूत प्रश्नांसाठी भाजप कटिबद्ध असून, नागरिकांच्या विश्वासावर आम्ही कायम खरे उतरण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळात विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू ठेवू.” कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे ही प्रचार फेरी भाजपसाठी विजयाचा शुभसंकेत मानली जात आहे.





















Join Our Whatsapp Group