पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात आला आणि त्याने महिलेवर बलात्कार केला. तडीपार केलेल्या आरोपीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अंमलदाराला या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

फारुख सत्तार शेख (वय २५, रा. बालाजीनगर, भोसरी एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे. फारुख पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचे मूळ वास्तव्य एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बालाजीनगर झोपडपट्टी येथे आहे. तो सध्या आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी फाटा येथे राहत होता. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आठ एप्रिल २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ‘तडीपार आरोपी दत्तक योजना’ राबवली जाते. ज्या पोलिस ठाण्यातील आरोपी तडीपार केले जातात, ते आरोपी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे विभागून देतात. तडीपार आरोपींचे लोकेशन घेणे, ते सध्या काय करतात, याबाबत माहिती अद्ययावत ठेवणे, त्यांनी कोणताही गुन्हा करू नये, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलिसांची असते. आरोपी शेखला एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार भागवत शेप यांना दत्तक दिले होते.

दोन महिन्यांपासून आरोपी शेख चिंबळी फाटा येथील घरी वास्तव्य करीत होता. याची कोणतीही खबर पोलिसांना लागली नाही. त्याने १८ डिसेंबरला सायंकाळी महिलेवर बलात्कार केला. सहा दिवसांनंतर या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली. वेळीच निगराणी न ठेवल्याबद्दल पोलिस अंमलदारास निलंबित करण्यात आले.
तडीपार गुंडांचे सर्रास शहरात वास्तव्य..
आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केतन प्रकाश शिंदे या तडीपार गुंडाकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले होते. चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोहित प्रकाश हिरे, संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिनेश गोरख माने या आरोपींकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली, तर काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील तडीपार गुंड स्वप्नील संजय येडते आणि सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथील तडीपार गुंड अक्षय दशरथ शिंदे यांना कोयता बाळगताना पोलिसांनी पकडले. त्यामुळे तडीपार गुंडांचे शहरातील राजरोस वास्तव्य उघड झाले आहे.






















Join Our Whatsapp Group