भाजपासमोर अक्षरश: नांगी टाकली : लांडे – गव्हाणे यांनी मैदान सोडले?
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी आमदार विलास लांडे आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आणि भाजपाला आव्हान देणार हे चित्र निश्चित होते. मात्र, अनपेक्षीतपणे लांडे आणि गव्हाणे यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याने तिकीट घेतले नाही. अपवाद विलास लांडे यांचे बंधू विश्वनाथ लांडे यांचा मुलगा विराज लांडे यांनी फक्त उमेदवारी अर्ज भरला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. वास्तविक, भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी राज्यातील महायुतीप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक एकत्रितपणे होईल, अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण स्वबळावर लढू अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा भाजपा स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

चिखलीतील प्रचार सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण ठोकले आणि ‘डरो मत’ असा संदेश दिला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुकांमध्ये उर्जा निर्माण होईल, असे चित्र होते. मात्र, लांडे आणि गव्हाणे यांची भूमिका पाहता राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक रामभरोसे आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.

उमेदवारी घेता का उमेदवारी?
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता शेवटचा दिसत होता. राष्ट्रवादीचे AB फॉर्म घेवून अजित गव्हाणे स्वत: उमेदवारांना विचारत होते. उमेदवारी घ्या आणि राष्ट्रवादीचा फॉर्म भरा. शहरातील 128 जागांसाठी उमेदवार देण्याकरिता अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांची मोठी कसरत सुरू असताना दिसली. म्हणजे शहरात 25-30 वर्षे सत्ता असतानाही राष्ट्रवादीला सक्षम उमेदवार देता आले नाही. सुरूवातीला प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत आणि आता उमेदवारी निश्चित करण्याच्या शर्यतीत राष्ट्रवादी पिछाडीवर राहिलेली दिसते. परिणामी, या निवडणुकीत भाजपा चांगली कामगिरी करणार, असे चित्र आहे.






















Join Our Whatsapp Group