पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११(क) येथून सौ. निशा दिनेश यादव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या भाजपाकडून तीव्र इच्छुक होत्या, पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या त्या पत्नी असून, इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कामांमुळे त्या प्रभागात परिचित चेहरा ठरल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ११ मधील पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल, अजंठानगर परिसरातून महिला राखीव जागेवर त्या तीव्र इच्छुक होत्या. त्यानुसार त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी, संवाद आणि पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्याचे काम त्यांनी केले होते. या काळात त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता.

मात्र ऐनवेळी पक्षाकडून त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या निशा यादव यांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, त्या निवडणूक लढवणार असल्यावर ठाम आहेत.

निशा यादव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे त्या प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरतात की पक्षश्रेष्ठी त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
























Join Our Whatsapp Group