पिंपरी (Pclive7.com):- पंढरपूरला आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ ला हा कार्यक्रम असणार आहे. काही मराठा संघटनांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान आंदोलनाच्या तयारीत आलेल्या १२ कार्यकर्त्यांना पोलीसांना ताब्यात घेतले आहे.
क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यामुळे पुणे पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असून कोणतीही गडबड होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे.
आज सोमवारी सकाळी हा कार्यक्रम चिंचवड केशवनगर येथील महासाधु मोरया गोसावी क्रीडांगणावर होणार आहे. या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरिश बापट यांच्या सह शहरातील सर्व भाजपा नेते उपस्थित राहणार आहेत.
आषाढी एकादशीला दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होते. मात्र यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन पुकारले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पंढरपूरात लाखो भाविक दाखल झाले आहे. टाळ, मृदुंगांच्या गजरात विठ्ठल नामात भाविक तल्लीन झाले आहे. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि मराठा समाजाच्या भावना न दुखावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुजेला जाणार नसल्याचा निर्णय घेतला अाहे अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
दरम्यान, चिंचवड येथील सभेच्यावेळी आंदोलन करणार असल्याचे मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच भाजपाचा एक गट निवेदन देणार आहे. याच सोबत शहरातील इतरही प्रश्नाबाबत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते भेटू शकतात. या सगळ्या शक्यता लक्षात घेवून पोलिसांनी मराठा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग सुचना दिल्या आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यामध्ये दोन पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, ३७ सहायक निरीक्षक, उप निरीक्षक, ५०० कर्मचारी आणि मुख्यालयातील अतिरिक्त पोलिस दल मागवण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group