प्रभाग २२ व २७ मधील राष्ट्रवादी उमेदवारांच्या विजय निर्धार सभेत अजितदादांची तोफ
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापकीर नगर, काळेवाडी येथे प्रभाग क्रमांक २२ व २७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य विजय निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना कडक शब्दांत मार्गदर्शन केलं.
“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा द्या. विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी योग्य उमेदवार निवडणं हीच काळाची गरज आहे,” असं स्पष्ट आवाहन त्यांनी केलं.

अजितदादा पवार म्हणाले की, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून शहराच्या आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आहे. मतदारराजानं यावेळी डोळस निर्णय घेऊन विकासाला मत द्यावं. प्रभाग क्रमांक २२ मधून मच्छिंद्र तात्या तापकीर, संतोष कोकणे, मोनिका नढे, उषा काळे आणि प्रभाग क्रमांक २७ मधून, अनिताताई कैलास थोपटे, सुमित डोळस, अश्विनीताई तापकीर आणि सागर कोकणे हे सर्व कार्यतत्पर, लोकाभिमुख उमेदवार असून त्यांना बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
महापालिकेच्या नेतृत्वाच्या काळाचा उल्लेख करत अजितदादा म्हणाले, “आम्ही महापालिकेचं नेतृत्व करत असताना सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन शहराचा कायापालट केला. रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, पायाभूत सुविधा अशी अनेक मोठी विकासकामं केली; मात्र कधीही शहरावर कर्जाचा बोजा टाकला नाही. आमच्या काळात महापालिकेवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आज मात्र कर्ज काढून शहराला भकास करण्याचं काम सुरू आहे. हे थांबवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसलाच संधी द्या.”

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सामाजिक सलोखा जपला असल्याचं सांगत अजितदादांनी जाती-पातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. “आम्ही कधीही जाती-पातीचं राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. सर्व घटकांना सोबत घेऊन, सर्वसमावेशक उमेदवारी देत आम्ही पुढे जात आहोत,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
सभेत बोलताना त्यांनी स्थानिक प्रश्नांवरही लक्ष वेधलं. पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मैदानांची कमतरता, नागरी सुविधांची दुरवस्था हे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रभावीपणे सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचं पाणी, डीपी रस्ते, वीज, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे सर्व प्रश्न नियोजनबद्ध पद्धतीनं सोडवण्याचा पक्षाचा ठाम निर्धार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
विजय निर्धार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. घोषणांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटात सभा उत्साहात पार पडली. शेवटी अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा ठाम शब्दांत सांगितलं, “ही निवडणूक विकास आणि विनाश यातील निवड आहे. कर्जाचा बोजा वाढवणाऱ्यांना धडा शिकवा आणि विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा.”






















Join Our Whatsapp Group