पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेत दीर्घकाळ नगरसेवक म्हणून प्रभावी भूमिका बजावलेल्या एका ज्येष्ठ नेत्याच्या कुटुंबातूनच बंडखोरी उफाळून आली आहे. या नेत्याच्या तरुण पुत्राने पक्षाच्या अधिकृत उमेदवारीला आव्हान देत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हा वाद कौटुंबिक मर्यादेत न राहता थेट राजकीय पातळीवर पोहोचला आहे.
या घटनेमुळे संबंधित पक्षात अंतर्गत तणाव निर्माण झाला असून, निवडणुकीच्या रिंगणातच राजकीय वादळ उठले आहे. वडिलांचा स्पष्ट विरोध असतानाही पुत्राने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षशिस्त, नेतृत्व आणि कौटुंबिक निष्ठा या मुद्द्यांवर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच संबंधित ‘बंडखोर पुत्र’ काही दिवस फोनवर कोणालाही उपलब्ध नव्हता. त्यामुळे हे बंड अचानक झाले नसून, हा कौटुंबिक मतभेदातून आलेला पूर्वनियोजित निर्णय असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केवळ संवादाअभावी हा प्रकार घडला, हा दावा अनेकांना पटत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, संबंधित ज्येष्ठ नेत्यांनी खुलासा करताना “मुलाला अर्ज मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया आणि वेळेचे भान राहिले नाही,” असे सांगितले. मात्र, तब्बल १५ वर्षे महापालिकेच्या सत्ताकेंद्रात असलेल्या नेत्याच्या घरात वाढलेल्या मुलाला अर्ज मागे घेण्याची साधी प्रक्रिया माहित नसावी, हे स्पष्टीकरण अनेकांना हास्यास्पद वाटत आहे. निवडणूक आयोगाची अर्ज भरण्याची प्रक्रिया (फॉर्म ए, बी, प्रतिज्ञापत्र, सूचक, अनुमोदक) ही माघारीपेक्षा कितीतरी क्लिष्ट असते. ती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला माघारीची प्रक्रिया माहित नव्हती, असे म्हणणे म्हणजे मतदारांच्या बुद्धिमत्तेचा अपमान असल्याची टीका होत आहे.

तसेच, एका बड्या नेत्याचा मुलगा निवडणूक लढवत असताना त्याच्या पाठीशी वकिलांची आणि कार्यकर्त्यांची फौज असते. त्या संपूर्ण टीमपैकी कोणालाही माघारीची अंतिम मुदत लक्षात राहिली नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे “मुलाला नियम माहित नव्हते” हा केवळ वडिलांचा ‘फेस सेव्हिंग’साठीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या ज्येष्ठ नेत्यासाठी घरातून होणारा विरोध ही काही पहिलीच वेळ नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील निवडणुकीतही त्यांचा त्यांच्या सख्ख्या भावासोबत राजकीय संघर्ष झाला होता. तेव्हा भावाचा विषय होता, आज इतिहासाची पुनरावृत्ती होत मुलानेच बंड पुकारले आहे. त्यामुळे हा केवळ तात्पुरता गैरसमज नसून, घरांतर्गत कलह आणि राजकीय महत्त्वाकांक्षेचा संघर्ष ही जणू एक परंपराच बनली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या सर्व घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात पक्षांतर्गत एकता, नेतृत्वाची विश्वासार्हता आणि कौटुंबिक संबंधांचा राजकारणावर होणारा परिणाम याबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. “ज्यांना स्वतःच्या घरातील मतभेद आणि असंतोष मिटवता आला नाही, ते लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागाचा आणि शहराचा विकास कसा करणार?” असा तिखट सवाल आता सुज्ञ मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा वाद संबंधित पक्षासाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.






















Join Our Whatsapp Group