पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आमदार लांडगे यांचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- “पिंपरी-चिंचवडकरांनो तुमचा स्वाभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे,” असे ठणकावून सांगत आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप–आरपीआय (आठवले) आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित महासभेत ते बोलत होते. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर व जिजामाता रुग्णालय परिसरातील प्रभाग क्रमांक २१ साठी सौ. उषाताई संजोग वाघेरे, सौ. मोनिका सुरेश निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा झाली.
“स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन करण्यासाठीच मी इथे आलो आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार महेशदादा लांडगे यांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या सभेत भाजप व स्वतःवर बेछूट आरोप करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी, “पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन कोणी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही, लंगोट बांधायला शिकवायचीही गरज नाही,” असे ठणकावून सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, “स्थानिकांना सन्मानाची वागणूक त्यांनी कधीच दिली नाही. “बाहेरून येऊन गावागावात वाद लावणाऱ्यांपासून सावध राहा. आज त्यांना १२८ उमेदवारही मिळाले नाहीत, कुठे कुठे काड्या घातल्या याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. आम्ही नुरा कुस्ती खेळणारी मंडळी नाही; जन्मताच लंगोट घालायला शिकलो आहोत. आमच्या लाडक्या बहिणीच त्यांचा कार्यक्रम करतील. देवेंद्रभाऊंच्या लाडक्या बहिणी या आमच्या सोबत आहेत.”
स्थानिक प्रश्नांवर बोलताना आमदार लांडगे म्हणाले, “पिंपरी गावाला काय हवे आहे, हे बारामतीत राहणाऱ्याला कळणार आहे का? पंचवीस वर्षे पालकमंत्रीपद आणि एकहाती सत्ता असूनही शहरासाठी काहीच केले नाही. रेड झोन व डेअरी फार्ममुळे स्थानिक भूमिहीन झाले; तीस वर्षांत हे प्रश्न त्यांना सुटले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि साडेबारा टक्क्यांचा प्रश्न सोडवला.” शहरात आपर्यंत २९ महापौर झाले, मात्र एकालाही राजकारणात पुढे जाण्याची संधी त्यांनी दिली नाही. आमच्या सुखदुःखात सहभागी होणारा, आमच्यातलाच नेता आम्हाला हवा आहे. विमानातून फिरणारा नाही.” “पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन खोटे आरोप, बदनामी करणे बंद करा. शहरातील माता-भगिनी व विद्यार्थी सुरक्षित वाटले पाहिजेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालय मंजूर करून घेतले. शहरातील नागरिक भाजपचे काम पाहत आहेत म्हणून मतदान करत आहेत. ही निवडणूक स्थानिक नेतृत्वाला बदनाम करणाऱ्यांना शहरातून हद्दपार करण्याची आहे.” असे शेवटी बोलताना महेश लांडगे म्हणाले.

संजोग वाघेरे राज्याच्या राजकारणात जाणार..
मनातील राग-द्वेष विसरून संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी उभे रहा. त्यांनी आजपर्यंत अनेक लोक जोडले असून योग्य वेळी निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज संपूर्ण भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत.” लोकसभेत संजोग वाघेरे यांना साडेसहा लाखांहून अधिक मते मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी, “आपला माणूस मोठा होऊ द्या. संजोग भिकू वाघेरे भाजपकडून राज्याच्या राजकारणात जाणार म्हणजे जाणारच,” असा विश्वास व्यक्त केला.

आता हाताला हाताने उत्तर देऊ – संजोग वाघेरे पाटील
यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पिंपरी गावचा विकास आजपर्यंत झालेल्या सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. गावात सर्वाधिक उद्याने, सुसज्ज जलतरण तलाव, ग्रामदैवत मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. डेरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला २०१२ साली मंजुरी मिळाली असून भाजप सरकारमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला. लवकरच हा पूल लोकांसाठी खुला होणार आहे.” ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून विरोधकांचा सुपडा साफ होईल. खोट्या आरोपांना बळी पडू नका. टीका झाली तर टीकेने उत्तर देऊ.. आता हाताला हाताने उत्तर देऊ.”
या सभेला विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, कामगार नेते बाबा कांबळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या महासभेस पिंपरीवासियांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
























Join Our Whatsapp Group