पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री. अजितदादा पवार गट) आणि शिवसेना (श्री. एकनाथ शिंदे गट) यांच्या युतीने प्रभाग क्रमांक २४ मध्ये आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचाराद्वारे स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरातील प्रचाराच्या केंद्रस्थानी आता हा प्रभाग असून, युतीच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

प्रभागातील गव्हाणे हॉस्पिटल परिसर, मातोश्री हॉस्पिटल, जय भवानी नगर, संतोष नगर आदी भागांतून काढण्यात आलेल्या पदयात्रांना मोठा प्रतिसाद लाभला. नागरिकांनी फुलांची उधळण, औक्षण व फटाक्यांच्या आतषबाजीतून उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. चौकाचौकांतून घुमणाऱ्या घोषणांनी आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने प्रचार फेऱ्यांना एक वेगळीच उंची मिळाली.
युतीचा प्रचार केवळ रस्त्यावर मर्यादित न राहता घराघरांत पोहोचताना दिसतो आहे. विकासकामांचा ठोस लेखाजोखा, स्थानिक प्रश्नांवर मांडलेली स्पष्ट भूमिका आणि भविष्यासाठीची विकासदृष्टी यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. सोसायटी परिसर, चौक आणि वस्तीभागांतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हीच युतीच्या वाढत्या ताकदीची साक्ष देतो.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये उभे असलेले युतीचे उमेदवार हा या प्रचाराचा मजबूत कणा ठरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (क गट) अधिकृत उमेदवार सौ. बारणे मायाताई संतोष (घड्याळ) यांनी आपल्या कार्यकुशलतेतून, नागरिकांशी थेट संवादातून आणि सामाजिक बांधिलकीतून प्रभावी प्रचार उभारला आहे. त्यांना नगरसेवक पदाचा दहा वर्षांचा अनुभव असून, तो प्रचारात ठळकपणे दिसून येतो.
शिवसेनेचे (अ गट) उमेदवार श्री. बारणे विश्वजीत श्रीरंग (धनुष्यबाण) हे तरुण, तडफदार आणि स्पष्ट दृष्टिकोन असलेले नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. त्यांच्या झंझावती भाषणांनी तरुणांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. (ड गट) मधील उमेदवार श्री. बारणे निलेश हिरामण (धनुष्यबाण) यांनाही दहा वर्षाच्या अनुभवाचा फायदा होत असून, संघटनात्मक ताकद त्यांच्या प्रचारात ठळकपणे दिसते. शिवसेना पुरस्कृत (ब गट) सौ. गुजर रूपालीताई लालासाहेब (रिक्षा) यांच्या सामाजिक कार्यामुळे महिलांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे.
एकूणच, उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध पदयात्रा, अनुभवी आणि विश्वासार्ह उमेदवार तसेच समाजाशी जोडलेला संवाद यामुळे राष्ट्रवादी–शिवसेना युतीने प्रभाग २४ मध्ये भक्कम पकड निर्माण केली आहे. “विकास, स्थैर्य आणि लोकहित” या सूत्रांवर आधारित प्रचारामुळे या प्रभागात विजयाची नांदी वाजत असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली असून, निवडणुकीची दिशा युतीच्या बाजूने झुकताना स्पष्टपणे दिसत आहे.






















Join Our Whatsapp Group