पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथे भव्य सभा पार पडली. या सभेत बोलताना आमदार अमित गोरखे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आणि भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवडसाठीचे स्पष्ट विकासदृष्टीकोन (व्हिजन) व गेल्या काळात केलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला.

आमदार गोरखे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम ज्या पवित्र स्थळी होतो, त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या जीवन व विचारांवर आधारित भव्य थीम पार्क उभारण्याचा संकल्प भाजप सरकारने केला आहे. हा प्रकल्प केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक व पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, पीएमआरडीएचा अन्यायकारक डीपी आराखडा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय फडणवीस सरकारने घेतला. आकुर्डीकरांचा गेली १० ते १५ वर्षे प्रलंबित असलेला साडेबारा टक्के (१२.५%) परताव्याचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावला, यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला, असे त्यांनी नमूद केले.
आमदार गोरखे यांनी सांगितले की, मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत नेण्यासाठी तरतूद करण्यात आली,
पिंपरी-चिंचवडसाठी १८० कोटी रुपयांचा पोलीस उपायुक्त कार्यालयाचा भव्य प्रकल्प मंजूर करण्यात आला. वायसीएम रुग्णालयाला पीजी इन्स्टिट्यूटचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांग भवन पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्यात आले, दिव्यांग नागरिकांसाठी २००० रुपये मासिक पेन्शन योजना लागू करण्यात आली. महावितरणचे राज्यातील अत्याधुनिक संगणकीय कार्यालय पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले.
याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व नागरी सुविधा या सर्व माध्यमातून पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास कसा साधला जात आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.पाण्याच्या प्रश्नाबाबत बोलताना आमदार गोरखे म्हणाले की, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, लवकरच पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची दीर्घकालीन गरज पूर्ण होणार आहे.

गोरखे यांनी शहराच्या भविष्यासाठी स्पष्ट, लोकाभिमुख आणि विकासकेंद्रित व्हिजन मांडला. “एक शहर – एक मतदानसंघ” या संकल्पनेतून सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा थेट सहभाग हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. शिवनेरी जिल्हा व सरकारी कार्यालयांचे विकेंद्रीकरण, एकात्मिक प्रशासकीय केंद्र, कल्याणकारी योजनांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स, स्मार्ट सिटी प्रशासन, स्मार्ट फॅमिली अॅप, तसेच आरोग्य व स्वच्छतेवर विशेष भर देत पिंपरी-चिंचवडला आधुनिक, सक्षम आणि संवेदनशील शहर बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे, हेच भाजपच्या विकास मॉडेलचे वैशिष्ट्य असल्याचे आमदार गोरखे यांनी ठामपणे नमूद केले.
शेवटी विरोधकांवर टीका करताना त्यांनी स्पष्ट सवाल केला की, “२०१४ पूर्वी एवढा विकास का झाला नाही? आज जो विकास दिसतो आहे, तो फडणवीस सरकारच्या निर्णयक्षम आणि धाडसी नेतृत्वामुळेच झाला आहे.”
सभेला चिंचवडचे आमदार शंकरशेठ जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद सदस्य उमाताई खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group