पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा ‘संकल्प शाश्वत विकासाचा’ हा जाहीरनामा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर देण्यात आला आहे.

यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‘झिरो गार्बेज आणि झिरो डम्पिंग’ हे ध्येय ठेवण्यात आले आहे. प्रत्येक घरापर्यंत रोज शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक प्रकल्प राबविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या जाहीरनाम्यात शहराच्या ओळखीला नवे परिमाण देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडसाठी ‘शिवनेरी’ नावाने स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न व मागणी केली जाणार आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंग आणि पत्रव्यवहारामध्ये पुणेऐवजी पिंपरी-चिंचवडचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडला ‘भारताची स्पोर्ट्स सिटी’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. चाकण, तळेगाव तसेच हिंजवडी-पिरंगुट परिसरासाठी स्वतंत्र औद्योगिक महापालिकेची मागणी करण्यात येणार आहे. यासोबतच अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार आधुनिक रस्त्यांची निर्मिती, राष्ट्रीय प्रेरणा स्मारक उभारणी, देहू-आळंदी भक्ती कॉरिडॉर, तसेच भोसरी आणि चाकण एमआयडीसीजवळ ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचाही समावेश जाहीरनाम्यात आहे.
या जाहीरनाम्याच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजित, आधुनिक आणि शाश्वत विकास साधण्याचा भाजपाचा संकल्प स्पष्ट करण्यात आला आहे.





















Join Our Whatsapp Group