पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी कॅम्प प्रभाग क्रमांक २१ मधील लोकवस्ती परिसरात प्रस्तावित कचरा संकलन केंद्र तात्काळ रद्द करावे, अन्यथा नागरिकांच्या वतीने पुढील आठवड्यात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी दिला आहे. याबाबत महापौर रवी लांडगे यांना निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरी कॅम्प परिसरातील नदीकाठावर तसेच घनदाट लोकवस्ती आणि मशिदीजवळ उभारण्यात येणाऱ्या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सुभेदार रामजी आंबेडकर नगर, संजय गांधी नगर, मिलिंद नगर, सुभाष नगर तसेच स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणारे नागरिक आणि पिंपरी–काळेवाडी मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार असल्याचे निकाळजे यांनी म्हटले आहे. वाहतुकीत अडथळे, दुर्गंधी आणि आरोग्य धोक्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत होणार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी कोणतीही तडजोड मान्य नसून हा प्रश्न तातडीने सोडवून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी कचरा संकलन केंद्राऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, झोपडपट्टीवासीयांसाठी उद्यान किंवा परिसरातील तरुणांसाठी व्यायामशाळा उभारावी, अशी पर्यायी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, कचरा संकलन केंद्राचा निर्णय रद्द न झाल्यास प्रभाग २१ मधील नागरिकांच्या वतीने पुढील आठवड्यात आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.




















Join Our Whatsapp Group