युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेत बंधारा येथे सांडपाणी व मैला सोडला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याबाबत तात्काळ संयुक्त पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांनी केली आहे.

युवासेना उपशहर प्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत म्हटले आहे की, शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्यात काही ठिकाणी थेट नाले जोडण्यात आले आहेत. या नाल्यांमधून दूषित पाणी बंधाऱ्यात मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्यातील हेच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतर शहरवासीयांना पुरविले जाते. त्यामुळे जलजन्य आजार, संसर्गजन्य रोग तसेच दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी स्वतः महापौर, स्थानिक नगरसेवक, विरोधी पक्षनेते, गटनेते तसेच आमदार आणि खासदारांसमवेत रावेत बंधाऱ्याची संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संबंधित विभागाला तात्काळ चौकशीचे आदेश देऊन अनधिकृत नालेजोडणी बंद करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Tags: Sagar Shinde






















Join Our Whatsapp Group