पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी बसस्टॉप परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. या बसथांब्यावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असल्याने परिसरात सतत गर्दीची परिस्थिती निर्माण होत आहे.

मोठ्या ट्रक, ट्रॅव्हल्स बस तसेच इतर जड वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. याशिवाय काही रिक्षाचालक बसथांब्याजवळ रस्त्यावरच गाड्या आडव्या लावून प्रवासी वाहतूक करत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. बसथांब्याच्या आजूबाजूला टपरीधारक आणि हातगाडीधारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून बसची वाट पाहावी लागत आहे. अनेकदा प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागत असून यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन निगडी बसस्टॉप हा भक्ती-शक्ती उद्यानासमोर स्थलांतरित करावा, अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच बसथांब्याच्या परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, रिक्षाचालक आणि ट्रॅव्हल्स बस यांना बसथांब्याजवळ प्रवासी वाहतूक करण्यास मज्जाव करावा आणि मोठ्या वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निगडी भक्ती-शक्ती मार्गे बसथांबा स्थलांतरित केल्यास वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group