पिंपरी (Pclive7.com):- रेल्वे थांबण्यापूर्वीच रेल्वेतून चुकीच्या पद्धतीने उतरणा-या प्रवासी मुलीला रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाचविले. ही घटना आज (गुरुवारी) चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे १५ वर्षीय मुलीचा एकप्रकारे पुनर्जन्म मिळाला.
शेख रोजी शहाउद्दीन (वय १५, रा. कुदळवाडी, चिखली) असे रेल्वेतून पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलीस नाईक अनिल बागुल, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम वाळेकर, रेल्वे पोलीस फोर्सचे जवान चंद्रकांत गोफणे या तिघांनी ही कामगिरी केली आहे.
लोणावळा रेल्वे स्थानकावरून सकाळी १०.१० वाजता सुटणारी लोकल (९९८०९) चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्थानकावर आली. रेल्वे स्थानकावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस कर्मचारी फलाटावर थांबले होते. याच लोकल गाडीतून शेख कुटुंबीय प्रवास करीत होते. त्यांना चिंचवड येथे उतरायचे होते.
लोकल थांबण्यापूर्वी रोजीने लोकलच्या वेगाविरुद्ध उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचा तोल जाऊन ती लोकल आणि प्लॅटफॉर्म यांच्या मध्ये पडली. त्यावेळी कर्तव्यदक्ष पोलिसांनी तिला वरती खेचले. त्यामुळे रोजी रेल्वे ट्रॅकवर पडली नाही. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रोजीला पुनर्जन्म मिळाल्याची भावना तिच्या आईने व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group