मुंबई (Pclive7.com):- नालासोपारा स्फोटक प्रकरणात आज आणखी एक मोठा खुलासा एटीएसकडून करण्यात आला आहे. श्याम मानव, मुक्ता दाभोळकर, जितेंद्र आव्हाड, रूतू राज, हे व्यक्ती अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या टार्गेटवर असल्याची माहिती एटीएसकडून न्यायालयात देण्यात आली.
आज सत्र न्यायालयात मुंबईतील माझगाव डॉक येथून अटक करण्यात आलेल्या अविनाश पवार यास हजर करण्यात आले होते. आजच्या सुनावणीत एटीएसने माहिती देताना म्हटले आहे की, एटीएसच्या तपासात त्यांना नवीन माहिती मिळाली असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे श्याम मानव, मुक्ता दाभोळकर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रूतू राज, या व्यक्ती अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या टार्गेटवर होत्या.
सुनावणीत मात्र कोर्टाने एटीएसला चांगलेच फटकारलं आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक असलेल्या अमोल काळेचा उल्लेख पहिल्या रिमांडपासून एटीएसने केला आहे. मात्र अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आतापर्यंत काय केलं? असा सवाल न्यायमूर्ती पडळकर यांनी विचारला असता. त्यावर एटीएसकडून समाधानपूर्वक उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी अद्याप एटीएसने कोणत्याही हालचाली न केल्याचे निदर्शनास आल्यावर न्यायालयाने नालासोपारा स्फोटकं प्रकरणी अटक आरोपी अविनाश पवार आणि आरोपींचा संबध काय असा सवाल एटीएसला केला? एटीएस पथकाकडून अटक आरोपी अविनाश पवार याच्याकडून तपास पथकाने पाच मोबाईल आणि २ सिम कार्ड जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिली. मात्र या बद्दल रिमांड अर्जात त्याचा उल्लेख नसल्याने कोर्टाने एटीएसला फटकारलं. कोर्टात येताना ‘हाल्फ हार्टेडली’ येऊ नका, त्याचा आरोपीला फायदा होऊ शकतो असे खडे बोल न्यायालयाने आज एटीएसला सुनावले.






















Join Our Whatsapp Group