पिंपरी (Pclive7.com):- दारू पिऊन मध्यरात्री भर रस्त्यावर पोलीसांशी हुज्जत घालून पोलीस स्टेशनमध्ये धिंगाना घालणा-या तरूणींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोरवाडी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून हा प्रकार गुरुवारी (दि. ३०) मध्यरात्री एक वाजता वाल्हेकरवाडी मधील आहेर गार्डनच्या बाहेर घडला. त्यावरून एक तरुण आणि दोन तरुणी असे तिघांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
स्मिता किशोर बाविस्कर (वय २२, रा. सेक्टर नंबर २२, ओटास्कीम, निगडी), प्रिया प्रदीप पाटील (वय ३०, रा. अंजिनाथा हाऊसिंग सोसायटी, पाटील नगर, चिखली) आणि आकाश मिलिंद कोरे (वय २५, कोकणे कॉलनी, नढे नगर, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस गुरुवारी (दि. ३०) मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोर स्मिता, प्रिया आणि आकाश हे तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याजवळ नंबर नसलेली दुचाकी होती. त्यामुळे पोलीसांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तरुणींनी पोलीसांना अर्वाच्य भाषा वापरली आणि पोलीसांशी हुज्जत घातली. त्यावरून पोलीसांनी तिघांनाही चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आणले. तरुणींनी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसोबत अर्वाच्य भाषा वापरून त्यांनी धिंगाना केला. त्यामुळे पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यावरून पोलीसांनी तिघांवरही गुन्हा नोंदवून अटक केली. तिघांनाही मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांची पंधरा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, दंगा घालणा-या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीमध्ये आरोपींनी दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ८५ या कलमाची वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३६३, २९४, ५०४,३४ आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय तपासणीनंतर आणखी एका कलमाची वाढ करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group