पिंपरी (Pclive7.com):- कसबा बावडा (कोल्हापूर) येथील डायमंड रुग्णालयातून ब्रेनडेड रुग्णांने केलेल्या अवयवदानामुळे पिंपरीतील दोघांचे प्राण वाचणार आहेत. कोल्हापूरातून आणलेले ‘हृदय’ हे थेरगांवच्या आदित्य बिर्ला हॅास्पीटलला तर ‘लिव्हर’ पिंपरीतील डॅा. डी.वाय.पाटील रुग्णालयास रस्ता मार्गाने रुग्णवाहिकेतून दाखल झाले. त्यावेळी कोल्हापूर ते पिंपरी अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार करण्यात आला. अवघ्या तीन तासात रुग्णवाहिकेने २४८ किमीचे अंतर कापले आहे. दरम्यान, पिंपरीतील डॉ.वाय.पाटील रुग्णालयात पहिल्यादांच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे.
कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील डायमंड रुग्णालयात सोशल वर्करने एका ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व सांगून ते इतर गरजू रुग्णांना कसे उपयोगी पडतील हे पटवून दिले. त्यासाठी त्यांना समुपदेशन केल्यानंतर अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी त्याचे हृदय, लिव्हर, अन्य अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूरातून रविवारी सायंकाळी ५ वाजता निघालेली रुग्णवाहिका पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या आवारात रात्री ८ वाजता पोहोचली. रुग्णवाहिकेतून हे हृदय आणि लिव्हर रस्ता मार्गाने पिंपरीत आणण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शहर आणि ग्रामीण विभागाच्या वाहतूक शाखेतील पोलीसांनी ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार केला होता. त्यामुळे रुग्णवाहिकेने तीन तासात तब्बल २४८ किमीचे अंतर पार केले. हे ‘लिव्हर’ आणि ‘हृदय’ आणण्यासाठी रुग्णवाहिकेसोबत चार जणांची टीम कार्यरत होती.
दरम्यान, पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात अशोक नन्ना यांना लिव्हर ची आवशकता होती. त्यानूसार शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली. त्यानूसार कोल्हापूरातून हे लिव्हर आणण्यात आले. त्यांची शस्त्रक्रिया रविवारी रात्री ८ वाजता सुरु करुन त्यांच्यावर प्रत्यारोपण करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी पिंपरीतील डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या विश्वस्त भाग्यश्री पाटील व डॉ. यशराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






















Join Our Whatsapp Group