पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात पुणेकरांनी वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून पुणे मेट्रोला मोठी पसंती दिली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी (१४ सप्टेंबर) तब्बल २ लाख ६२ हजार ६७१ प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या प्रवासी संख्येत ४६ हजार २९७ प्रवाशांची वाढ झाली असून, एकूण प्रवासी संख्येत २१.४० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व आरामदायी व्हावा यासाठी मेट्रो गाड्यांची वारंवारता वाढवून दर पाच मिनिटांनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शहरातील प्रमुख गणेश मंडळांकडे जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रात्री ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावर सर्वाधिक ५१ हजार ५३३ प्रवाशांची नोंद झाली. तर इंटरचेंज केंद्र असलेल्या जिल्हा न्यायालय (डिस्ट्रिक्ट कोर्ट) स्थानकावर ५८ हजार ९४८ प्रवाशांनी प्रवास केला. या दोन्ही स्थानकांवर गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २२ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. याशिवाय पीसीएमसी स्थानकावर २५ हजार ४२९, रामवाडी स्थानकावर २३ हजार ६४४, स्वारगेट स्थानकावर २१ हजार ९९ आणि पीएमसी स्थानकावर १९ हजार २६७ प्रवाशांची नोंद झाली.

गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांना रात्री उशिरापर्यंत गणपती दर्शन घेता यावे यासाठी पुणे मेट्रोने विशेष विस्तारित वेळापत्रक लागू केले आहे. तसेच कसबा पेठ, स्वारगेट, पीएमसी, डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान या स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाचा वापर प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी क्यूआर कोड, मेट्रो ॲप आणि व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध डिजिटल तिकीट सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळून सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुणे मेट्रो सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.



















Join Our Whatsapp Group