पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. भटकी कुत्री, डुक्करांच्या समस्यांनी नगरसेवकांची झोप उडवली आहे. मात्र या प्रश्नाचं महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला काहीच देणंघेणं नसल्याचं समोर आलं आहे. शहरात भटकी कुत्री आणि डुक्करांचा प्रश्न ‘आ’वासून उभा असताना पिंपरीत असलेल्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी भर दुपारी ऑनड्युटी कार्यालयात खुर्चीवर बसून ‘गाढ झोपेत’ असल्याचे दिसून आले आहे.
काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते संजय गायके काल दि.२८ रोजी दुपारी पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यलयात गेले असता राजू गायकवाड हा कर्मचारी खुर्चीवरच गाढ झोपी गेल्याचे दिसून आले. त्यावेळी गायके यांनी या झोपाळू कर्मचाऱ्याचा फोटो मोबाईलमध्ये कैद केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात भटकी कुत्री आणि डुक्करांचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय यांच्या कार्यालयात डुक्करांचे पिल्लू सोडले होते. तर दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पाळीव कुत्र्यांसह महापालिकेबाहेर आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधींकडून एकीकडे अशा गंभीर प्रश्नांसाठी आंदोलने केली जात असताना पशुवैद्यकीय विभागाला त्याचं ‘काहीचं सोयरे सुतक’ नसल्याचं समोर आलं आहे.
नुकतीच महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर कामाच्या वेळेत बाहेर फिरणारे, उपाहारगृहात तास न् तास गप्पांचे फड रंगवणारे, विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोहिमेद्वारे अचानक तपासणी घेण्यात आली. त्यात पालिका मुख्यालयातील या तपासणी मोहिमेत १०० हून अधिक कर्मचारी दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तर दुसरीकडे महत्वपूर्ण असलेला पशुवैद्यकीय विभागच झोपी गेल्याचे समोर आल्याने आयुक्त आता यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





















Join Our Whatsapp Group