पिंपरी (Pclive7.com):- युती संपली म्हणून मावळ आणि शिरूरमध्ये सभा आयोजित केली नाही. तर, या दोन्ही मतदारसंघात नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी ही सभा आयोजित केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मित्रपक्षांनी मोदींना पाठिंबा दिला, तर या दोन्ही मतदारसंघातून दिल्लीला त्यांचे २ खासदार पाठवू, अन्यथा आमचे खासदार निवडून आणू, असा स्पष्ट इशारा त्यांनी शिवसेनेला दिला.
निगडी, प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, दिलीप कांबळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आमदार चंद्रकांत हाळवणकर, प्रशांत ठाकूर, बाबुराव पाचार्णे, योगेश टिळेकर, खासदार अमर साबळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीने एका व्यासपीठावर यावे. त्यांचे १५ वर्षांचे राजकारण आणि आमची ४ वर्षांची सत्ता. या ४ वर्षांत आम्ही उजवे ठरलोत, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली तरी भाजपला काहीच फरक पडत नाही. असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले. मावळ आणि शिरूरसाठी मदनलाल धिंग्रा मैदानावर कोणाच्या विरोधात भाजपने सभा घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी कोण आहे, हे समजण्यासाठी ही सभा आहे. मावळ आणि शिरूरमध्ये सभा घेतोय याचा अर्थ युती संपली का? असा प्रश्न काहींना पडला आहे. या दोन्ही मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडूण आणण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट होती म्हणून खासदार निवडून आणले म्हणणाऱ्यांना २०१९ मध्ये आम्ही सुनामी आणण्यासाठीच ही सभा घेतली आहे. मोदींना पंतप्रधान करणे ही देशाची आवश्यकता आहे. त्यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला हवे आहे. त्यामुळे त्यांना जे पाठिंबा देतील, त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असेच खासदार निवडूण आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपने शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ५० हजार कोटी रुपये जमा केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने ८ हजार कोटी दिले होते. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सिंचनाच्या नावावर स्वतःची घरे आणि तिजोरी भरली. भाजप सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून दिला. रस्ते आणि सिंचन क्षेत्रात सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले. तुम्ही तिजोऱ्या भरण्यासाठी जनतेचे पैसे लाटले आणि आम्हाला विचारता तुम्ही काय केले? असा सवाल त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केला.काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पिंपरी-चिंचवडसाठी १५ वर्षात आयुक्तालय सुरू करू शकले नाही. भाजप सरकारने अवघ्या ४ वर्षांत पोलीस आयुक्तालय सुरू केले. शहरात मेट्रोचे काम सुरू केले. शास्तीकर रद्द केला. शहराचा पाण्याचा प्रश्नही भाजप सरकार निश्चितपणे सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवडचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित होते. राज्यात भाजपची सत्ता येताच गेल्या चार वर्षांत मी स्वतः आणि आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करुन प्रलंबित असलेले ९० टक्के प्रश्न सोडवले आहेत. अमृत योजनेअंतर्गत शहरासाठी ३०० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मिळवून दिले. शहराचा स्मार्ट सिटी योजनेतही समावेश केला. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातून सर्वात जास्त निधी पिंपरी-चिंचवडला दिला. या येजनेअंतर्गत शहरात सुमारे २० हजार घरे उभारण्यात येणार आहेत. मोशी कचरा डेपोच्या भोवती बफर झोनची हद्द १०० मीटरपर्यंत आणले. नागपूरसारखेच पिंपरी-चिंचवडमध्येही मेट्रोचे काम वेगाने व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून काम प्रगतीपथावर आणले. शहरासाठी वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध करून दिले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, सुरेश हाळवणकर, महेश लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group